पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad News) महापालिका निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी आज, 11 नोव्हेंबर आज आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रशासनाने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ही सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर प्रत्येक प्रभागातील चित्र स्पष्ट होणार आहे. 128 पैकी तब्बल 64 जागा महिलांसाठी राखीव असल्याने, यंदा महापालिकेत महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय असणार आहे.

अनेक इच्छुकांना माघार घेण्याची शक्यता
महापालिका निवडणूक मोठ्या खंडानंतर होत आहे. 2020 पासून अनेक इच्छुकांनी नगरसेवक होण्यासाठी आपल्या प्रभागात तयारी केली. त्यांनी मतदारांशी संपर्क साधत आणि विविध कार्यक्रम घेत निवडणूक लढवण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र, जर त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण पडले, तर या पुरुष उमेदवारांच्या राजकीय कार्यकीर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. कुटुंबात पर्याय म्हणून एखादी योग्य महिला उमेदवार नसल्यास, अशा इच्छुकांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी लागेल. महापालिका निवडणुकीतील जागांसाठीचे आरक्षण समीकरण आता बदलले आहे. एकूण जागांपैकी निम्म्या जागा (50 टक्के) महिला उमेदवारांसाठी असणार आहे.
दरम्यान, आजच्या सोडतीनंतर अनेक पुरुष इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असले तरी, महापालिकेत महिला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास काय परिस्थिती असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







