Election : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार थांबल्यानंतरही मतदारांना फितवण्याचे प्रकार सुरूच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. थेट भाषणं, सभा आणि जाहिराती बंद झाल्यावर राजकीय पक्षांनी आता छुप्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारल्याचं चित्र आहे. कुठे रोख रकमेचं वाटप, तर कुठे महागड्या वस्तूंच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचे प्रकार राज्यभरातून उघडकीस येत आहेत. (Election)

असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवडमधून समोर आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड प्रभागातील रहाटणी परिसरात मतदारांना थेट वॉशिंग मशीन वाटप केलं जात असल्याची माहिती आचारसंहिता कक्षाला मिळाली. ही बाब लक्षात येताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तातडीने धाड टाकली. 12 जानेवारी 2026 रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास गणराज कॉलनी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत एका वाहनातून तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त करण्यात आली. संबंधित वाहनाचा क्रमांक MH14 KA 6330 असा आहे.
निवडणूक काळात अशा प्रकारच्या वस्तूंचं वाटप थेट आचारसंहितेचं उल्लंघन ठरतं. मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय आणि प्रलोभनांशिवाय मतदान करावं, हा लोकशाहीचा मूलभूत पाया आहे. मात्र अशा घटना या प्रक्रियेलाच सुरुंग लावणाऱ्या आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने एसएसटी, एफएसटी आणि व्हीएसटीसारखी पथकं नेमून शहरात कडक नजर ठेवली आहे.
या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कोणीही असो, नियम मोडत असेल तर कारवाई झालीच पाहिजे. निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक असली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अशा निर्णायक टप्प्यावर समोर येणाऱ्या या घटना केवळ एका शहरापुरत्या मर्यादित नसून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. त्यामुळे मतदारांनी सजग राहणं आणि प्रशासनाने कठोर भूमिका घेणं, हेच या निवडणुकांचं भवितव्य ठरवणार आहे.






