पुणे: सायबर गुन्हेगार पुण्यात आपले जाळे अधिक घट्ट करत असून, विविध क्लृप्त्या वापरून नागरिकांना लाखो रुपयांना गंडा घालत आहेत. ‘शेअर बाजारात भरघोस परतावा मिळेल’ अशा आमिषांना बळी पडून अनेकांची आयुष्यभराची कमाई क्षणात सायबर गुन्हेगारांच्या घशात जात आहे. गेल्या काही दिवसांत पुणे शहरात सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

सायबर चोरटे आता केवळ जुन्याच पद्धती वापरत नाहीत, तर दररोज नवनवीन क्लृप्त्या शोधून काढत आहेत. ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि तंत्रज्ञानाची कमी माहिती असलेल्या व्यक्तींना ते प्रामुख्याने लक्ष्य करतात.
खडकी येथील ६० वर्षीय एका महिलेला नुकताच एक धक्कादायक अनुभव आला. “तुमचा धनादेश मिळवण्यासाठी अर्ज भरण्यासाठी दिलेली फाइल डाउनलोड करा,” असे सांगत एका अनोळखी व्यक्तीने तिचा विश्वास संपादन केला. महिलेने ती फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड करताच, काही मिनिटांतच तिच्या खात्यातून १२ लाख रुपये काढून घेण्यात आले. एका क्षणात बँक खाते रिकामे झाल्याचे पाहून महिलेला मोठा धक्का बसला.
बँकेतून, सरकारी कार्यालयातून किंवा अगदी गॅस कंपनीतून बोलत असल्याचे भासवून ‘केवायसी अपडेट’, ‘बिल भरणे’, किंवा ‘अर्ज भरणे’ या नावाखाली बनावट लिंक्स किंवा ‘एपीके’ फाइल्स पाठवल्या जातात. त्या उघडताच बँक खात्यातून पैसे गायब होतात.
काही प्रकरणात, सीबीआय किंवा ईडीचे अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी देऊन लोकांना घाबरवून पैसे उकळले जातात.
पुण्यात गेल्या काही दिवसांत, म्हणजे ९ ते १४ जुलै दरम्यान, सायबर चोरट्यांनी नागरिकांना करोडो रुपयांचा गंडा घातला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तक्रारींनुसार, फसवणुकीची रक्कम विचारात टाकणारी आहे.
- खराडीमध्ये सीबीआय/ईडी अधिकारी असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठाची २६ लाख ५० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली.
- टिंबर मार्केट (खडक) भागात गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने ९२ हजार रुपयांना गंडा घातला गेला.
- भीमपुरा लेन (लष्कर) येथे टेलिकॉम गुंतवणुकीच्या आमिषाने ७ लाख ५३ हजार रुपये लंपास करण्यात आले.
- विश्रांतवाडीत ऑनलाइन टास्कच्या नावाखाली ३ लाख ५८ हजार रुपये लुटले गेले.
- भारती विद्यापीठात ऑनलाइन ॲपद्वारे शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १० लाख ३८ हजार रुपये हडपले गेले.
- वारजे माळवाडीत एका फायनान्स कंपनीत जादा नफ्याचे आमिष दाखवून २८ लाखांना गंडा घालण्यात आला.
- कोंढव्यात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक झाली.
- येरवडा आणि केसनंद (वाघोली) येथे शेअर बाजारात अधिक परताव्याच्या आमिषाने अनुक्रमे ३९ लाख ९० हजार आणि १० लाख रुपयांची फसवणूक झाली.
- एरंडवणे आणि एनआयबीएम (कोंढवा) येथेही शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून अनुक्रमे १५ लाख आणि आणखी १५ लाख रुपयांची फसवणूक झाली.
या घटनांवरून सायबर गुन्हेगार किती सक्रिय झाले आहेत हे स्पष्ट होते. नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आणि कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा मेसेजला प्रतिसाद न देणे हेच सायबर गुन्हा रोखण्याचा प्रभावी उपाय आहे.






