लंडन: सकाळी उठल्यावर आरशात पाहतो (Viral News) तर काय, शरीर पूर्णपणे निळं पडलेलं! असाच काहीसा धक्कादायक अनुभव ब्रिटनमधील 42 वर्षीय टॉमी लिंच याला आला. सुरुवातीला एखाद्या गंभीर आजाराची लक्षणं वाटणारी ही घटना अखेर एका मजेशीर वळणावर संपली, ज्यामुळे घाबरलेले डॉक्टरही पोट धरून हसू लागले.

टॉमी लिंच सकाळी झोपेतून उठला तेव्हा त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. जेव्हा त्याने आपल्या हातापायांकडे पाहिलं, तेव्हा त्याची त्वचा एखाद्या ‘अवतार’ सिनेमातील पात्रासारखी निळी दिसत होती. टॉमीचा मित्र, जो पेशाने परिचारक आहे, त्याने वेळ न घालवता टॉमीला तातडीने हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात (ER) नेले. डॉक्टरांना वाटले की, टॉमीच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली असावी, त्यामुळे त्यांनी तातडीने त्याला ऑक्सिजन मास्क लावून तपासणी सुरू केली.
रहस्य उलगडलं एका ‘कापसाच्या बोळ्याने’
डॉक्टरांनी जेव्हा टॉमीचा हात स्वच्छ करण्यासाठी ‘अल्कोहोल स्वॅब’ वापरला, तेव्हा आश्चर्याची गोष्ट घडली. तो पांढरा कापूस लगेच गडद निळा झाला. तिथूनच या कोड्याचं उत्तर मिळालं. टॉमीने नुकतीच एक नवीन ‘नेव्ही ब्लू’ रंगाची बेडशीट विकत घेतली होती. ती बेडशीट न धुताच त्याने सलग दोन रात्री वापरली. रात्री झोपेत आलेल्या घामामुळे बेडशीटचा कच्चा रंग टॉमीच्या संपूर्ण शरीराला लागला होता. हे कळताच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये हशा पिकला. टॉमीला तो रंग घालवण्यासाठी सलग एक आठवडा लागला, तेव्हा त्याच्या त्वचेचा रंग सामान्य झाला असे त्यांनी सांगितलं.






