मुंबई: टी20 वर्ल्डकप 2026 जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी आता (Vaibhav Suryawanshi) आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अत्यंत व्यस्त वेळापत्रक सुरू होणार आहे. जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत (Team India) भारताला सलग अनेक मालिका आणि दौरे खेळायचे असल्याने भारतीय क्रिकेट संघाला एकाच वेळी दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरवावे लागू शकतात. (Cricket News)

वर्ल्डकप विजयानंतर भारतीय संघाचे लक्ष आता आगामी मालिकांवर आणि 2027 च्या वनडे विश्वचषकाच्या तयारीवर असेल. सध्याच्या वेळापत्रकानुसार, भारत जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारताला पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या वेळापत्रकात आणखी काही दौरे जोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा भारत दौरा होणार असून त्यामध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत. याच काळात भारताला युएईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान जपानमधील नागोया येथे आशियाई क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. भारत हा टी20 क्रिकेटमध्ये गतविजेता असल्याने त्या स्पर्धेत सुवर्णपदक कायम राखण्याचे आव्हान संघासमोर असणार आहे. याशिवाय झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका खेळण्याबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
एकाच कालावधीत अनेक स्पर्धा आणि मालिका असल्यामुळे भारतीय निवड समितीसमोर संघरचनेचे मोठे आव्हान उभे राहू शकते. त्यामुळे काही मालिकांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे झाल्यास वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांसारख्या युवा खेळाडूंना भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळण्याची शक्यता वाढू शकते. आगामी काही महिन्यांत भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक आणि संघरचना कशी ठरते, याकडे आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






