पुणे: पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला असून, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) दिलेल्या कठोर इशाऱ्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही तर मोठ्या हल्ल्याचा इशारा देत ट्रम्प यांनी थेट कारवाईची भाषा केल्याने युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने इराणमधील भारतीय नागरिकांसाठी तातडीची अॅडव्हायजरी जारी केली आहे. (Iran-America War)

भारतीय दूतावासाने स्पष्ट शब्दांत पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत, नागरिकांनी जिथे आहेत तिथेच सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, तसेच वीज प्रकल्प, लष्करी ठिकाणे आणि उंच इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः हॉटेलमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तिथेच थांबून दूतावासाशी सतत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अॅडव्हायजरीमागील मुख्य कारण म्हणजे सध्याची अनिश्चित आणि वेगाने बदलणारी परिस्थिती. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढल्यास त्याचा थेट परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर, विशेषतः परदेशी नागरिकांवर होऊ शकतो. त्यामुळे भारताने कोणताही धोका टाळण्यासाठी आगाऊ खबरदारी घेतली आहे.
दूतावासाने आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाईन क्रमांक आणि ईमेलही जाहीर केले आहेत, ज्यामुळे अडचणीत असलेल्या भारतीयांना तात्काळ मदत मिळू शकते. अशा परिस्थितीत अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवणे आणि अफवांपासून दूर राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
एकूणच, हा तणाव केवळ दोन देशांपुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे इराणमधील भारतीयांसाठी हे निर्देश केवळ सावधगिरीचे नसून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ठरत आहेत.







