मुंबई: मुंबईच्या गुन्हेगारी जगतात अनेकदा शुल्लक (Crime) कारणावरून हत्या केल्या जातात, पण गोरेगावच्या वनराई पोलिसांनी उघडकीस आणलेले हत्येचे प्रकरण वाचून कोणाचाही थरकाप उडेल. केवळ ‘तळलेले मासे’ खाल्ल्याच्या संशयावरून दोन मित्रांनी आपल्याच जिवलग मित्राची दगडाने ठेचून हत्या केली.

23 फेब्रुवारीच्या रात्री, 35 वर्षीय अफसर आपल्या दोन मित्रांसह (सुरेश आणि राजेश ऊर्फ नेपाळी) दारू पित असतांना. त्यांनी सोबत मासे आणले होते आणि ते तव्यावर तळून बाजूला ठेवले होते. मद्यधुंद अवस्थेत अफसर झोपी गेला. दरम्यान, उघड्यावर ठेवलेले ते मासे उंदरांनी फस्त केले. मात्र, जेव्हा सुरेश आणि राजेश जेवणासाठी उठले, तेव्हा तव्यावर मासे नसल्याचे पाहून त्यांचा संयम सुटला. झोपलेल्या अफसरनेच आपल्याला न विचारता सर्व मासे खाल्ले, असा संशय त्यांना आला आणि याच रागातून त्यांनी झोपेतच अफसरवर हल्ला केला.
या प्रकरणाचा तपास करणे वनराई पोलिसांसाठी अत्यंत कठीण होते. आरोपींकडे ना मोबाईल फोन होता, ना कोणताही पत्ता. गुन्ह्यानंतर आरोपी तातडीने हरियाणाला पळून गेले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही आणि माहितीच्या आधारे सुमारे 200 कचरा वेचकांची माहिती काढली. तासनतास केलेल्या चौकशीतून मृताची आणि संशयितांची ओळख पटली. पोलिसांनी तांत्रिक तपासाची साखळी जोडत हरियाणातील कैथल गाठले आणि तिथून सुरेश व राजेशला अटक केली.
तपासात धक्कादायक बाब समोर आली की, आरोपी राजेश ऊर्फ नेपाळी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी दादरसह अनेक पोलीस ठाण्यांत खून आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.






