पुणे: महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांचे (Zilla Parishad Election) बिगुल अखेर वाजणार असून, राज्य निवडणूक आयोगाकडून आज याबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाला 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे. यामुळे ज्या 12 जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्यांच्या निवडणुक कार्यक्रम आज घोषित केला शकतो. या निवडणुकांच्या घोषणेसोबतच संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये तातडीने आचारसंहिता लागू होणार आहे.

निवडणूक आयोगाकडून अपेक्षित असलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 19 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत पार पडू शकते. त्यानंतर अर्जांची छाननी 29 आणि 30 जानेवारी रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांना 2 फेब्रुवारी पर्यंत मुदत असेल, तर 3 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. प्रत्यक्ष मतदान 12 किंवा 13 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता असून, 14 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल.
या पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, परभणी, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या 12 जिल्हा परिषदांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. नंदुरबार, पालघर आणि गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने तिथे सध्या निवडणुका होणार नाहीत. आज होणाऱ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष या संभाव्य वेळापत्रकाकडे लागले आहे.







