Pune Crime: पुणे : अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांच्या पथकाने वाघोली पोलीस स्टेशनमध्ये लाच मागणी व स्वीकार प्रकरणात मोठी कारवाई करत पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दि. 25/11/2025 रोजी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने (33), आपल्या तक्रारीत हवालदार परमेश्वर मानिक माखरे (वय 37) यांनी वारंवार 5,000 रु. लाचेची मागणी केल्याचा आरोप केला होता. तक्रारदाराने मा. विटा कोर्ट यांनी तिच्या पतीकडील थकीत पोटगी 6,65,000 रु. वसूल करण्यासाठी दिलेले रिकव्हरी वॉरंट पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर हे प्रकरण पुढे आले.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपी हवालदाराने वॉरंट बजावणीचा रिपोर्ट देण्यासाठी लाच न दिल्यास वॉरंट पुढे नेणार नाही, अशी धमकी दिली होती. पीडित महिलेने तक्रार 24/11/2025 रोजी अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल झाली होती.
25/11/2025 रोजी पडताळणी दरम्यान देखील हवालदार माखरे यांनी 5,000 रु. ची लाच मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच दिवशी वाघोली पोलीस स्टेशनसमोर, अहिल्यानगर रोडवरील एका चहाच्या टपरीवर सापळा रचण्यात आला. दुपारी 12:09 वाजता आरोपीने तक्रारदाराकडून 5,000 रु. स्वीकारताच ACB पथकाने त्याला पंचासमक्ष रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास पुढे चालू आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी अतिरिक्त रक्कम किंवा लाच मागत असल्यास त्वरित ACB कार्यालयाशी संपर्क साधावा.







