IAS Transfer : बिहारमध्ये शुक्रवारी मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने तब्बल २३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या यादीत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे जावई श्रीकांत खांडेकर यांचाही समावेश आहे. (IAS Transfer)

सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अधिकृत आदेश काढण्यात आले असून, प्रशासन अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. या फेरबदलात उपविकास आयुक्त (DDC), नगर आयुक्त आणि उपविभागीय अधिकारी (SDO) पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या बदल्यांमध्ये समीर सौरभ यांची पटना येथील उपविकास आयुक्त-सह-मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करण्यात आली असून, त्यांची आता कॉम्फेड, पटना येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर दीपक कुमार मिश्रा यांची नालंदा नगर आयुक्त पदावरून बदली करून त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात संयुक्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बिहार विकास मिशनच्या अपर संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारीही देण्यात आली आहे.
डीडीसी पदांवर नव्या नियुक्त्या
या फेरबदलात सर्वाधिक चर्चा झाली ती श्रीकांत कुंडलिक खांडेकर यांची. त्यांची पटना जिल्ह्याचे नवे उपविकास आयुक्त (DDC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय,

-
शुभम कुमार – नालंदा
-
सूर्य प्रताप सिंह – समरलीपूर
-
लक्ष्मण तिवारी – सारण
-
गौरव कुमार – गोपालगंज
यांचीही डीडीसीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच,
-
काजले वैभव नितीन – पश्चिम चंपारण
-
दिव्या शक्ती – कैमूर
-
श्वेता भारती -खगडिया
-
गीरद कुमार – सहरसा
या जिल्ह्यांचे नवे उपविकास आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
एसडीओ पदांवर बदल
कृतिका मिश्रा यांची गोगरी येथून बदली करून पटना सदरच्या नव्या एसडीओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
आकांक्षा आनंद यांची बारसोई येथून बदली करून मुजफ्फरपूर (पश्चिम) येथे एसडीओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
तर रोहित कर्दम यांची शेखपुरा येथून बदली करून नवगछीया (भागलपूर) येथील एसडीओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
कोण आहेत श्रीकांत खांडेकर?
श्रीकांत खांडेकर हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील बावची गावाचे आहेत. प्राथमिक शिक्षण गावातच झाल्यानंतर त्यांनी सोलापूरमध्ये बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे दापोलीच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची पदवी त्यांनी घेतली.
यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि पहिल्याच प्रयत्नात IAS झाले. विशेष म्हणजे, देशात ३३ वा क्रमांक पटकावत त्यांनी यश मिळवलं.
IAS झाल्यानंतर राम शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. पुढे शिंदे यांची कन्या डॉ. अक्षता शिंदे आणि श्रीकांत खांडेकर यांचा जून २०२१ मध्ये विवाह झाला.
बिहार केडर मिळाल्यामुळे श्रीकांत खांडेकर गेली सहा वर्षे बिहारमध्येच सेवा देत आहेत, आणि आता त्यांच्यावर पटना जिल्ह्याची मोठी प्रशासकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे.





