Pune Crimeराजगुरुनगर, (पुणे) : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खेड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र अंधाराचा फायदा घेत आणखी दोघेजण फरार झाले आहेत. गुरुवारी (ता. १३) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
सुरज तुकाराम लावंड (वय २८ रा. मोशी, ता. हवेली ), जीत गिरीश चांदणे (वय-१९ रा. भोसरी, पुणे), जीवनसिंग अमरसिंग काकरवाल (वय २९ रा. पिंपरी पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अंधाराचा फायदा घेत दोघेजण फरार झाले आहेत. पोलिसांनी दरोड्याच्या साहित्यासह एक टेम्पो जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार….!
पाडळी परिसरातील चासकमान धरणाच्या कालवा परिसरात टेम्पो घेऊन चार ते पाच जण चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ जाऊन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून कटावणी, ब्लेड, रॉड, मिरचीपूड असे साहित्य मिळून आले.
दरम्यान, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे करीत आहे.