जुन्नर : येडगाव धरणाच्या जलाशयात फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील एका ५ वर्षांच्या मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना येडगाव (ता. जुन्नर) येथील धरणाच्या जलाशयात घडली आहे. या घटनेने जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
इशान आखिल कढि (वय – ५ रा. अल्फा बिल्डींग, मेघविहान सोसायटी, पंढरीनगर, हांडेवाडी चौक, पुणे) असे बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. शनिवारी (ता. १८) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा (ता.जुन्नर) येथील डॉ. राजेंद्र शामराव धांडे यांच्या समवेत पुणे येथील अखिल भरतकुमार कढि व त्यांचे तीन मित्र सहकुटुंब शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येडगाव धरण जलाशयाजवळ फिरण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर अखिल कढि हे मुलगा इशान याला खांद्यावर घेऊन जलाशयात उतरले.
अखिल यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय खडकावरून घसरला आणि ते पाण्यात पडले. मात्र त्यांच्या खांद्यावर असणारा ईशान पाण्यात वाहत गेला. खोल पाण्यात गेल्याने सर्वांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र ईशान सापडला नाही. काही वेळाने या भागात काम करत असलेल्या तरुणांनी पाण्यात जाऊन शोधाशोध सुरू केली. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर ईशानला पाण्यातून बाहेर काढले.
दरम्यान, त्याला तातडीने नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेने शोककळा पसरली असून फिरायला येताना काळजी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
धरण परिसरात चोवीस तास बंदोबस्त आहे. तसेच परवानगी नसताना सुद्धा नागरीक सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी येत असतात. अधिक तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.