Ashok Kharat : मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कारकीर्द सुरू करून पुढे स्वतःला ‘अध्यात्मिक गुरु’ म्हणवुन घेणारा अशोक खरातचा चेहरा आता पूर्णपणे उघडा पडत आहे. सुमारे 100 कोटींचं साम्राज्य उभारणाऱ्या या भोंदूबाबाने अंधश्रद्धा, भीती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून लोकांना फसवल्याचं तपासात समोर आलं आहे.

खरातच्या ‘दरबारात’ चमत्कार दाखवण्यासाठी तो बनावट साधनांचा वापर करत असे. मंदिर परिसरात ठेवलेले साप प्रत्यक्षात रिमोट कंट्रोलने चालणारे होते. त्यांना हलवून तो ‘दैवी संकेत’ असल्याचा आभास निर्माण करायचा. यामुळे घाबरलेले भाविक त्याच्यावर विश्वास ठेवत. त्याचप्रमाणे, नकली वाघाची कातडी, गूढ वातावरण आणि अघोरी साहित्य वापरून तो स्वतःभोवती एक भीतीदायक प्रतिमा तयार करत असे.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातने संमोहन कलेचाही गैरवापर केला. एकदा व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली आली की, ‘विशेष पूजा’ किंवा ‘दोष निवारण’च्या नावाखाली तो त्यांच्याकडून मोठ्या रकमा उकळत असे. बाजारात 100 रुपयांना मिळणाऱ्या वस्तू तो 10,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत विकत असे. काचेचे तुकडे आणि साधे खडे ‘दैवी रत्ने’ म्हणून विकण्याचे प्रकारही समोर आले आहेत.
या प्रकरणाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे लैंगिक शोषणाचे आरोप. पोलिसांना सुमारे 58 अश्लील व्हिडिओ मिळाले असून, त्यातून महिलांना धमकावून किंवा गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. एका पीडितेच्या तक्रारीनंतर या सगळ्या कारवायांना सुरुवात झाली.
या प्रकरणात केवळ सामान्य लोकच नाही, तर काही प्रभावशाली व्यक्तींचाही संपर्क असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे खरातचं जाळं अधिक मजबूत झालं.







