बारामती : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बारामतीत मोठी कारवाई करत महिला पोलीस हवालदाराला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी (10 सप्टेंबर 2025) करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणातील चौकशी महिला पोलीस हवालदार अंजना नागरगोजे यांच्याकडे होती. तक्रारदार व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर कलम 498, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या तिघा नातेवाईकांना थेट जामीन मिळवून देण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी नागरगोजे यांनी एकूण 1 लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
नंतर तडजोड करत प्रत्येकी 5,000 रुपये या प्रमाणे चार आरोपींसाठी 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणाची तक्रार तक्रारदाराने 9 सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे फोनद्वारे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने ACB पथकाने पडताळणी केली असता, नागरगोजे यांनी थेट 20,000 रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज (10 सप्टेंबर) बारामती तालुका पोलीस ठाण्यातच सापळा रचण्यात आला आणि आरोपी नागरगोजे यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केली.







