नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलने त्यांच्या दोन्ही प्लॅनची वैधता 30 दिवसांनी कमी केली होती. यानंतर, युजर्संना बीएसएनएल जिओ आणि एअरटेल या कंपन्यांप्रमाणेच प्लॅन आणेल, असे वाटत होते. मात्र, आता बीएसएनएलने एक असा खास प्लॅन आणला आहे, जो 150 दिवसांसाठी असेल आणि त्यानंतर ग्राहकांची रिचार्जची चिंता मिटू शकते.
बीएसएनएलचा 150 दिवसांच्या वैधतेसह हा प्लॅन ज्या किंमतीत आला आहे, त्यामुळे जिओ आणि एअरटेलला तगडे आव्हान मिळणार आहे. या किमतीत, खाजगी कंपन्या 150 दिवसांची वैधता देत नाहीत. अशा परिस्थितीत, 150 दिवसांच्या वैधतेसह हा बीएसएनएल प्लॅन सर्वात जास्त वैधता असलेला प्लॅन बनेल. बीएसएनएल ७० दिवस, १८० दिवस, १६० दिवस, ३३६ दिवस, ३६५ दिवस असे अनेक प्लॅन ऑफर करते. हा १५० दिवसांचा प्लॅन त्याच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन आहे. त्याची किंमत ३९७ रुपये असणार आहे.
या पॅकमध्ये ग्राहकांना पहिल्या 30 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग मिळेल. तसेच पहिल्या 30 दिवसांसाठी ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. अशा प्रकारे, या प्लॅनमध्ये एकूण 60GB डेटा उपलब्ध असेल. 30 दिवसांनंतर, ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार अॅड-ऑन डेटा आणि कॉलिंग सुविधा जोडता येऊ शकतील. या प्लॅनमध्ये युजरला दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील.