मालेगाव (नाशिक): नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं जीवंत असतानाच स्वत:च्याच मृत्यूचा दाखल तयार करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका बचत गटाकडून कर्ज घेतलं होतं. त्यानंतर कर्जाचे पैसे बुडवण्यासाठी त्याने हा प्रताप केला आहे. जिवंतपणीच त्याने स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवला. एका मित्राच्या मदतीने त्याने हा दाखला दाखवत कर्जातून मुक्तता करून घेतली. यानंतर पोलिसांनी घटनेची पडताळणी करून जिवंत असताना मृत्यूचा दाखला बनवणाऱ्या तरूणासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे. याविषयी एका अज्ञात व्यक्तीने पत्राद्वारे पोलिसांना माहिती दिली तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्यांना 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपाधीक्षक गुंजाळ यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.