सोलापूर: जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून येत्या दोन-तीन दिवसांत सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार मार्च महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून एप्रिल महिन्यात निवडणुका घेणार असल्याने पुढील महिन्यात कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुको पार पडण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर बाजार समितीच्या निवडणुका आहे, त्या स्थितीत घेण्याच्या आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला आहे. त्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे येत्या दोन-तीन दिवसांत पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, मतदार यादीचा सहा महिन्यांचा कालावधी संपल्याने नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी सहकार, पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमास स्थगिती दिली होती. या विरोधात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे समर्थक बसवराज माळगे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे पुढील महिन्यात बाजार समितीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयाने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप, काँग्रेससह इतर सर्व पक्षातील नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. बाजार समितीवर आपल्या पक्षाची सत्ता कशी येईल, यासाठी आमदार विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह सर्व नेते चाचपणी करत आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार केला असून त्याचा प्रस्ताव येत्या दोन-तीन दिवसांत राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसार चालू महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम तसेच पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगितले.