अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून संतापजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातील मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत शिक्षण घेत असलेल्या ९ वर्षाच्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातील एका प्राचार्याने आपल्याच शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकावर कोतवाली पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत (बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२) कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिकांमध्ये मुख्याध्यापक संतोष देवरे बाबत संताप
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मुख्याध्यापक संतोष देवरे या नराधमाने पीडित विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अनेक वेळा अनैसर्गिक अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याध्यापक संतोष देवरे फरार झाला आहे. तीन पोलीस पथके आरोपीचा शोध घेत आहेत. यामुळे स्थानिकांमध्ये मुख्याध्यापक संतोष देवरे बाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल: पोलीस उपअधीक्षक अमोल भारती
दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती म्हणाले, “एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष देवरे याने त्याच्या शाळेतील नऊ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. चिमुकला आणि मुख्याध्यापक एकाच इमारतीत राहायला आहेत. मुख्याध्यापकाने शाळा सुटल्यानंतर मुलाला स्वतःच्या खोलीवर बोलवून त्याच्यासोबत अश्लील चाळे केले, अशी फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. फिर्यादिवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून लवकरात लवकर आरोपीला ताब्यात घेतले जाईल”, असे उपअधीक्षक अमोल भारती यांनी म्हटले आहे.