अहिल्यानगर : अहिल्यानगर येथून बेपत्ता झालेले व्यापारी दीपक लालसिंग परदेशी ( वय 68 ) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यांचा 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले व नंतर गळा आवळून खून करण्यात आला. दीपक परदेशी असे अपहरण करून खून केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात तोफखाना पोलिसांनी बडतर्फ पोलिसासह इतर दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज, मंगळवारी (18 मार्च) दिले आहेत.
अधिक माहिती अशी की, किरण बबन कोळपे ( वय 38, रा. विळद, ता अहिल्यानगर) व त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे 28 , ब्राह्मणी, राहुरी) अशी आरोपींची नवे आहेत. आरोपींनी खुनाची कबुली दिल्याचे तपासी अधिकारी तथा तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद इंडिका दिसली
व्यापारी दीपक परदेशी यांची चितळे रस्त्यावर त्यांचे दुकान आहे . परदेशी बोल्हेगाव उपनगरात राहतात. परदेशी 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात केली होती. त्यानंतर पोलिसांनी परदेशी यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी अनेकांचे जबाब नोंदवले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये पोलिसांना तीन ठिकाणी एक संशयास्पद इंडिका गाडी जाताना आढळली. त्यानंतर ही गाडी किरण कोळपे वापरत असल्याचे पोलिसांच्या समोर आले. यावरून तपास करत पोलिसांनी कोळपे व त्याचा साथीदार मोरेला ताब्यात घेतले.
परदेशी यांच्याकडूनच पैसे उकळण्याचा डाव रचला
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी दीपक परदेशी यांनी विळद गावातील जगताप, भुजबळ, खरमाळे, आडसुरे यांना पैसे दिले होते. हे पैसे वसूल करून देण्याचे काम किरण कोळपे याच्यावर सोपवले होते. या कामात कोळपेने सागर मोरेला मदतीला घेतले. मात्र या दोघांना ती रक्कम वसूल करता आली नाही. त्यानंतर या दोघांनी परदेशी यांच्याकडूनच पैसे उकळण्याचा डाव आरोपींनी रचला असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
गळा आवळून गडीतच केला खून
दरम्यान, व्यापारी परदेशी यांना आरोपींनी बोल्हेगाव येथून इंडिका गाडीत बसवले. नंतर किरण कोळपेने त्यांच्याकडे 10 कोटींची मागणी केली. आरोपी सागर मोरेने त्यांचे दोन्ही हात बांधले. मोटारीमध्ये परदेशी यांच्याशी झटापट झाली. तेंव्हा आरोपी मोरेने नायलॉनच्या दोरीने परदेशी यांचा गळा आवळला तर कोळपेने त्यांचे हातपाय बांधले. त्यानंतर निंबळक बाह्यवळण रस्त्याजवळ दोघांनी परदेशी यांचा दोरीने गळा आवळून गडीमध्येच खून केला. परदेशी यांचा खून केल्यानंतर गाडीतून मृतदेह निंबळक बाह्यवळण रस्त्यावर नेऊन तेथे सिमेंटच्या बंदिस्त नालीमध्ये मृतदेह टाकण्यात आला. त्यानंतर आरोपी किरण कोळपे व सागर मोरे पुन्हा एमआयडीसीकडे परत आले. त्यानंतर व्यापारी दीपक परदेशी यांचा मोबाईल आरोपी सागर मोरेने तेथून जाणाऱ्या एका गाडीमध्ये फेकला.