करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे. श्रीकांत वाघमारे (वय-४२, रा. कुर्डुवाडी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (दि.२८) रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरपीएफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले होते. ते शुक्रवारी (दि. २८) जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंग करत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास केके एक्स्प्रेस येत असताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीची वाघमारे यांना जोरात धडक बसली. या धडकेत वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला. श्रीकांत वाघमारे हे मूळचे माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी आहेत. वाघमारे पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.