सोलापूर: सोलापूरमधून एका चोरट्याला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. येथे दिवसा घराचे रंगकाम करणाऱ्या आणि रात्र होताच घराचे कुलूप तोडून चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास अटक करण्यात आली आहे. या सराईत चोरट्याने तब्बल 5 घरांची कुलपे तोडून लाखो रुपयांचा माल लंपास केला आहे. शिवा सत्यनारायण अलवाल (वय 29 वर्ष, रा. पद्मशाली चौक, दाजी पेठ सोलापूर) असे आरोपीचे सराईताचे नाव आहे. त्याला अटक करून पोलिसांनी 35 ग्रॅम सोन्याचे दागिने, 415 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपये असा एकूण 2 लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातल्या रविवार पेठेतील रहिवासी संतोष येरला आणि त्यांचे कुटुंबीय हे जानेवारी महिन्यात देवदर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोलीसांनी कसुन चौकशी केली असता आरोपी पेंटर शिवा सत्यनारायण अलवाल याने संतोष येरला यांच्यासह पाच ठिकाणी चोरी केल्याचे मान्य केले.
आरोपी अलवालने ‘या’ ठिकाणी केली चोरी…
आरोपी शिवा अलवाल याने जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक, सदर बाझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 आणि फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.