कोल्हापूर: स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यावर हिंदीमध्ये शंभर-दोनशे कोटी रुपये खर्च करून चित्रपट बनवणे ही बाब कौतुकास्पद आहे, परंतु असा ऐतिहासिक चित्रपट काढण्यापूर्वी किंवा तो प्रदर्शित करण्यापूर्वी एकदा इतिहासकार किंवा त्याबाबतीतील तज्ज्ञ जाणकारांशी चर्चा करावी, असा सल्ला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना दिला.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारी रोजी देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता कौशल हा लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दाखवण्यात आला. आहे. या ट्रेलरमधील दृश्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेऊन चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. याबाबत न्यू पॅलेस येथे माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेऊन मला चित्रपटाचा ट्रेलर दाखवला होता; पण मी त्यांना तेव्हाच हा संपूर्ण चित्रपट पाहायचा आहे आणि आपण इतिहासकारांचे मत घेऊया, असे सांगितले होते, जेणेकरून चित्रपटात काही दुरुस्ती असल्यास त्या करून संपूर्ण जगात हा चित्रपट प्रदर्शित होईल. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे; पण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ज्या पद्धतीने लेझीम खेळताना दाखवले आहे ते कितपत योग्य आहे? दिग्दर्शक तसेच संपूर्ण चित्रपटाच्या टीमने हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासतज्ज्ञ आणि जाणकारांशी चर्चा करावी आणि मगच चित्रपट प्रसिद्ध करावा, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.