जिंती : पुणे-सोलापूर लोहमार्गावरील 301/2-3 हा भीमा नदीवरील रेल्वे पूल व रूळ तपासणी व निरीक्षणादरम्यान सुव्यवस्थित व तंदुरुस्थ अवस्थेत आढळून आला आहे. त्यामुळे जिंती (ता. करमाळा) येथील रेल्वेच्या चतुर्थ श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनिट क्र 9 व 10 ला प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे दखल घेऊन बक्षीस दिल्यामुळे कामगारांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर जिंती व परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
मध्य रेल्वेच्या वतीने दरवर्षी विभागातील रेल्वे लाईन, स्थानके, प्लॅटफॉर्म, स्वच्छता व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची तपासणी करण्यात येते. यावर्षी सोलापूर विभागातील लोहमार्गाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दौंड, भिगवण, जिंती, जेऊर, कुर्डूवाडी, माढा, मोहोळ, मलिकपेठ व सोलापूर स्थानकादरम्यान असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
भिगवण (ता. इंदापूर) व जिंती (ता. करमाळा) या मध्य रेल्वेच्या रेल्वेस्थानकादरम्यान, भीमा नदीचा पूल आहे. हा पूल 35 ते 40 वर्ष जुना आहे. या लोहमार्गावरून मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या जात आहेत. त्यामुळे या पुलाची तपासणी करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकासह अधिकाऱ्यांचे पथक जिंती येथील रेल्वे पुलावर तपासणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 13) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाले.
रेल्वेच्या पथकामधील अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या पुलाची सक्षमता, पुलावरील रूळ, नट बोल्ड व नागरीकांना पुलावरून जाण्यासाठी असलेल्या सुविधांची तपासणी केली. त्यावेळी पुलावरील रेल्वे लाईन तंदुरुस्थ व सुरक्षित असल्याचे तपासणीत दिसून आले. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी जिंती येथील दोन्ही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनिटचे मेट तेजेस धेंडे व गोरख मकरे यांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता राजेश अरोरा, सोलापूर रेल्वे विभागाचे मुख्य व्यवस्थापक नीरजकुमार दोहरे, विभागीय मुख्य अभियंता सचिन गणेर, उपविभागीय अभियंता व्हटकर, जेऊरचे पीडब्लूआय इरफान खान व जिंती येथील रेल्वे कर्मचाऱ्यांचे युनिट नंबर 9 व 10 कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बक्षिसामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तर जिंती येथील सर्व रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून शुभेच्छा देऊन कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना जिंती युनिट क्र. १० चे मेट तेजेस धेंडे म्हणाले की, मागील 15 वर्षाहून अधिक काळ रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करीत आहेत. आम्ही नेहमी रेल्वेच्या रुळाची कामे करीत असतो. मात्र आज आमच्या सर्वांच्या कामाची दखल घेऊन खुद्द मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकडून बक्षीस स्वीकारले आहे. याचा आम्हाला खूप आनंद होत असून अभिमान वाटत आहे. व हे सर्व यश आमच्या सर्व सहकाऱ्यांचे आहे. बक्षिसरुपात मिळालेली रक्कम समाजोपयोगी कामांसाठी देणार आहे.