अजित जगताप / बामणोली : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाला भरघोस मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या मूळ गावी आले आहेत. त्यांनी सर्वप्रथम श्री उत्तेश्वर देवस्थानला जाऊन श्री चे दर्शन घेतले. त्यांतर दरे ग्रामस्थांची भेट घेऊन पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण जी प्रार्थना केली. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.
नवी दिल्ली येथे भाजपचे नेते यांची भेट घेण्यासाठी महायुतीचे तीन नेते गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणीस, अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र बसून निर्णय घ्या, असं अमित शहा यांनी सांगितले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी आले. या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी काही काळ दूरदर्शन संचाच्या पुढे बसले. आणि राज्यातील घडामोडीचा आढावा घेतला. काहींशी थेट मोबाईल द्वारे संवाद साधला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले कि, अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही. अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपद मिळाले हाच गौरव आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे काय निर्णय घेतला जाईल. तो मला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे दरे परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शासकीय पातळीवर चर्चा केली. महाबळेश्वर परिसरात कडाक्याची थंडी असल्यामुळे गरम कपडे घालूनच इच्छुकांनी दरे गावी यावे. उद्या दुपारी ते पुन्हा मुंबईला जाणार असल्याचे सांगितले.