अकोला : अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असता रस्त्यातच मुलीने आपली गाडी उभी करून विहरीत उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. आईने सकाळी रागावल्यातून मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातल्या ग्राम शिरपूर-शिरसो रस्त्यावर एका शेतातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला. नम्रता विनोद गरदे (वय २१) असं आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव आहे. मुर्तीजापुर गावातील विनोद गरदे आणि कांचन गरदे यांची नम्रता ही मुलगी आहे.
मुलगी घरी न परतल्याने शोधाशोध
नम्रता रोजच्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर गेली होती. मात्र रात्री ९ वाजल्यानंतर देखील ती घरी आली नाही. यामुळे तिच्या आईने शोध सुरू केला. तिने भाऊ सतीश भगत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत नम्रता तुमच्याकडे आली का? म्हणून विचारणाही करण्यात आली. मात्र नम्रता तेथेही नव्हती. मैत्रिणीकडे शोध घेतला असता तिथेही ती नव्हती. कुटुंबीयांना तिचा सुगावा लागत नव्हता, दरम्यान सकाळी तिला आईनं रागावल्याचेही भावाला सांगितले होते. ती नाराज झाली असेल आणि मैत्रिणीकडे गेली असेल असे कुटूंबियांना वाटत होते.
विहिरीजवळ आढळली बॅग
या शोधाशोधी दरम्यान नम्रताची स्कुटी हिरपूर- सिरसो रस्त्यावरील त्यांच्या शेताजवळ उभी असल्याची माहिती मिळाली. तर शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग देखील ठेवल्याचे आढळून आले. याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली. विहिरीत मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर बाहेर काढण्यात आला. कपडे व पायातील बुटावरुन मृतदेह नम्रता गरदे हिचा असल्याचीही खात्री पटली. त्यानंतर उपस्थित लोकांच्या मदतीने पोलिसांकडून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. पुढील पोलीस तपास सूर आहे.