वाशिम : वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथून बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे बापाने आपल्या पोटच्या मुलाची धारदार चाकुने पोटात वार करत निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणा कारंजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित बापाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अनिल मोखडकर (वय 40) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तर गोपाल मोखडकर असं आरोपी बापाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही बापलेक आपल्या कुटुंबासोबत कारंजा शहरानजीक असलेल्या कारंजा बायपास भागात वास्तव्याला आहेत. मागील अनेक दिवसांपासून मयत मुलगा अनिल आणि आरोपी गोपाल यांच्यात संपत्तीवरून भांडण सुरू होते. मयत अनिल दारु प्यायचा त्याला दारुचं व्यसन होतं. मयत अनिल दारु पिऊन अनेकदा कुटुंबासोबत संपत्तीवरून भांडण करायचा.
दरम्यान, शनिवारी(12 एप्रिल) सकाळी पुन्हा अनिल आणि त्याचे वडील गोपाल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. झालेल्या भांडणामुळे संतप्त झालेल्या बापाने अनिलच्या पोटात चाकूने वार केला त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला. तसेच कारंजा पोलिसांनी मारेकरी बापाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी कारंजा शहर पोलीसांकडून करण्यात येत आहे.