गडचिरोली: गडचिरोलीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत इयत्ता तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीनंतर लाहेरी पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकास अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नराधम मुख्याध्यापकला अटक केली आहे. रविंद्र गव्हारे असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा आणि मुलींशी अश्लील चाळे करायचा. घडलेल्या प्रकारबाबत कोणाला सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची व मारण्याची धमकी द्यायचा.
मुख्याध्यापकाच्या धमकीला घाबरून मुलींनी या प्रकारची वाच्यता पालकांसमोरही केली नाही. मात्र काही मुलींनी शाळेत जाण्यास नकार दिला. त्यानंतर पालकांनी मुलींना विश्वासात घेतले असता, मुलींनी घडलेला प्रकार सांगितला.
या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे याच्याविरूद्ध बाल लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यास भामरागड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.