नागपूर: नागपूर हिंसाचाराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील हिंसाचाराच्या मास्टरमाईंडने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली असल्याची माहिती समोर आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीचा पोलिसांनी एफआयआर नोंदवले आहेत. यात फहीम खान या व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली होती. त्यानंतर शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. एफआयआर नुसार फहीम खान आपल्या साथीदारांसोबत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनानंतर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी गेला होता.
फहीम खान कोण आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. हिंदू संघटनांनी केलेल्या घोषणाबाजी नंतर तो पोलीस स्टेशनला 50-55 लोकांसोबत निवेदन देण्यासाठी गेला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात फहीम खान याने 2024 नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्याची अमानत रक्कमही जप्त झाली होती. दंगल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फईम खान याचाही समावेश आहे.
त्याने दिलेल्या चिथावणीने जमाव हिंसक झाला. असा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे आता फहीम खान हाच नागपुरातील दंगलीचा मास्टरमाईंड आहे का, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.