नागपूर: नागपूरमध्ये एका डॉक्टर जोडप्याच्या वैवाहिक कलहाचा शेवट हत्येने झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉ. अर्चना राहुले यांची त्यांचे पती डॉ. अनिल राहुले आणि त्यांचे दिर रवी राहुले यांनी निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर असलेले डॉ. अनिल राहुले यांनी त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधले होते, तर त्यांच्या भावाने तिच्या डोक्यावर रॉडने वार केले होते. चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
नागपूर पोलिसांनी डॉ. अनिल राहुले आणि रवी राहुले या दोघांनाही अटक केली आहे. न्यायालयाने पुढील तपासासाठी पोलिसांना चार दिवसांची कोठडी दिली आहे. पोलीस आता हत्येमागील परिस्थितीचा तपास करत आहेत. अनेकांनी या निर्घृण हत्येबद्दल दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.