भंडारा : भंडाऱ्यातील गावात चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी एका महिलेसह चौघांना जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यातील एकाचा नागपूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना भंडाऱ्याच्या पहेला गावात शनिवारी (13 एप्रिल) मध्यरात्री घडली. मोहम्मद मुबारक सय्यद (वय 22 वर्ष ) असं मृतकाचं नावं आहे. तर पृथ्वीराज खंगार (वय 35 वर्ष ) धनराम टेकाम (वय 40 वर्ष ) आणि रज्जू सय्यद (वय 55 वर्ष ) हे तिघेजन गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (13 एप्रिल) मध्यरात्री गावातील 20 ते 25 जणांनी मृतक मोहम्मद याचं घरं गाठून त्याच्यासह पृथ्वीराज आणि धनराम यांना चोर असल्याच्या संशयावरून विचारपूस करीत जबर मारहाण केली. यावेळी मोहम्मद याची आई रज्जु ही त्यांना सोडविण्यासाठी आली असता त्यांनाही ग्रामस्थांनी मारहाण केली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले. यातील उपचारा दरम्यान मोहम्मदचा मृत्यू झाला आहे. तर रज्जू या गंभीर स्थितीत आहेत. यांच्यावर नागपूर तर अन्य दोघांवर भंडाऱ्यात उपचार करण्यात येत आहेत.
या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.