पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतून आता तब्बल आठ लाख महिलांना 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेचं मिळणार असल्याने लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढल आहे. याचं कारण म्हणजे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या आठ लाख महिलांना लाडकी बहिणी योजनेतून 1500 रुपयांचा लाभ घेता येणार नाही.
राज्य सरकारने 2023 मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. म्हणजेच चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही. या अटीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना 1500 रुपयाऐवजी 500 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते मार्च अशा महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. दरम्यान एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिल रोजी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.