नाशिक : ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वत्र प्रयत्न होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. ही धक्कादायक बाब पेठ रोडवरील फुलेनगर भागात समोर आली. नितीन फकिरा रणशिंगे (२३) असे मृत युवकाचे युवकाचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी पेठरोड भागात निघालेल्या मिरवणुकीत रणशिंगे सहभागी झाला होता.
फुलेनगर येथील तीन पुतळ्याजवळ सायंकाळी ७.३० च्या सुमारास डीजेचा दणदणाट सुरू असताना हा प्रकार घडला. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे अचानक नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्तस्राव सुरू झाला. ही बाब निदर्शनास येताच भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.
फुप्फुसाच्या क्षयरोगाने पीडित असल्याने नितीनवर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. तो न्यूमोनिया या आजारावरही उपचार घेत होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.