चोपडा (जळगाव) : शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करण्यासाठी टोळीसोबत आलेल्या जालन्यातील पीएसआयला चोपडा पोलिसांनी अटक केली. प्रल्हाद पिराजी मांटे (५८, रा. सदर बाजार, जालना) असे त्याचे नाव आहे. त्याच्या तीन साथीदारांनाही ताब्यात घेतले. बसस्थानकात परजिल्ह्यातील टोळी प्रवाशांचे दागिने आणि पैसे लंपास करत असल्याच्या घटना वाढल्या आहेत.
त्यामुळे पोलिसांचे पथक संशयितांच्या मागावर होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पथक बसस्थानक परिसरात सापळा रचून बसलेले होते. तेव्हा चोरट्यांची एक टोळी कारमधून (एमएच ४३, २९२८) येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने धरणगाव नाक्यावर सापळा रचून कार अडवली. तेव्हा या टोळीसोबत असलेला जालना येथील पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे देखील सापडला.
या टोळीतील श्रीकांत भीमराव बघे (२७, रा. खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (४३, रा. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) रऊफ अहमद शेख (४८, रा. महाळस, जि. बीड) यांच्या मुसक्या आवळल्या. यातील साळगावकरवर चोरीचे तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत
अवघ्या तीन महिन्यांनंतर होती सेवानिवृत्ती
मांटेच्या सेवानिवृत्तीला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. सदर बाजार परिसरातील बसस्थानकावर ड्युटीवर असताना त्याची चोरट्यांसोबत ओळख झाली. तेथूनच तो त्यांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे.