नाशिक: कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. कोकाटे यांच्यावर शासकीय कोट्यातील घरे फसवणुकीने मिळवल्याचा आरोप आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणावर आज (दि. ५) सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली असून त्याबाबत सुनावणी होण्यासाठी पंधरा दिवस कामकाज तहकूब करुन वेळ देण्यासाठी नाशिकच्या सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. परंतु, दाखल केलेल्या याचिकेवर रीट याचिका क्रमांक आणि अर्जदाराची स्वाक्षरी नसल्यामुळे अंजली राठोड यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली आहे.
खालच्या कोर्टाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांची आमदारकी कायम राहणार आहे. कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या 10 टक्के कोट्यातून घर घेतल्याने कनिष्ठ न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूना यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.