नाशिक: नाशिकमधून खंडणी मागितल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे भाजपा कामगार आघाडीचा सरचिटणीस रोहित कैलास कुंडलवाल(पंचवटी मखमलाबाद नाका, उदय कॉलनी) याने वडिलांच्या मदतीने बेकायदेशिर सावकारी केल्याचे समोर आले आहे. नशिक मधील व्यावसायिक दाम्पत्याकडून खासगी सावकारीतून अतिरिक्त व्याज वसूल केले. तसेच पन्नास लाखांची खंडणी मागून त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला व दोघांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन आरोपी रोहितला कुंडलवाल याल अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, पीडित महिलेचे भद्रकाली पोलिसांच्या हद्दीतील हुंडीवाला लेन येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. तिने व पतीने कपडे व्यवसाय थाटण्यासाठी कुंडलवाल यांच्याकडून व्याजाने पंधरा लाख रुपये घेतले होते. यानंतर, 2022 पासून 12 मार्च 2025 या काळात कुंडलवाल यांनी महिलेस दिलेल्या 15 लाख रुपयांच्या कर्जाच्या मोबदल्यात अवाजवी दराने तब्बल 38 लाख रुपये वसूल केले. त्यानंतर मुद्दल व व्याज एकत्रित असे पन्नास लाख रुपये मागितले. यप्रकरणी भद्रकाली पोलिसांत एका 40 वर्षीय कापड व्यावसायिक महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी रोहित व त्याचे वडील कैलास बाबुलाल कुंडलवाल (वय 56) यांच्याविरुद्ध कार्यवाही झाली आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
50 लाखांची रक्कम न दिल्याने रोहित याने पीडितेस कॉलेज रोडवरील बिग तवा हॉटेल येथे बोलावून घेतले. त्यानंतर फोर्ड इंन्डेव्हर कारमध्ये जबरदस्तीने बसवून प्रसाद सर्कल जवळील जीममध्ये नेले. तेथे नेऊन शिव्या दिल्या. त्यानंतर पीडित महिलेस आणि तिच्या पतीस पंचवटीतील भक्तीधाम सिग्नलजवळ बोलावले आणि पिस्तूलाचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. रोहितने दुकानात येऊन अवाजवी पैशांची मागणी करत पीडित महिलेच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून अश्लिल कृत्य केले. त्यावेळी धमकीही दिली. यानंतर रोहितसह त्याच्या वडिलांविरुध्द भद्रकाली पोलिसांत खंडणीसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंद करुन रोहितला अटक करण्यात आली आहे.