जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोन गावाजवळील स्मशानभूमीजवळ धावत्या बसचा अपघात झाला आहे. चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर धडकल्याने अपघात झाला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना आज(शुक्रवार) सकाळी घडली आहे. मात्र, या दुर्घटनेत बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना तत्काळ जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
लाडली येथून निघून ही बस जळगाव येथे रेल मार्गे येत असताना दोन गावाजवळील स्मशानभूमीनजीक हा अपघात घडला. धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस नेहमीप्रमाणे आज लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. येथील दोन गावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ येताच भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील यांचा ताबा सुटल्याने वळणावरील जवळील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. त्यानंतर, बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामध्ये 28 प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने बसमधून उतरवत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली आहे.