बीड: बीड जिल्ह्यामधील गुन्हेगारीची नवनवीन प्रकरणे समोर येण्याची मालिका सुरूच आहे. आता युसुफ वडगाव पोलीस ठाण्याबाहेर आज (दि. 20) एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, एका महिलेने संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून घेतल्याने आता हे प्रकरण काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, इथेही पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली होती. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या पालकांना युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तेथील पोलिसांनी दिला. परंतु, एक महिना होऊन गेला असला, तरी या प्रकरणात हलगर्जीपणा होत असल्याने संतप्त झालेल्या पीडित आईने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती पोलिसांकडून घेतली जात असून पुढील प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळत आहे.