लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी (दि. 15) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप मयताची ओळख पटली नसून पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह जिल्हाभरात खुनाच्या घटनांत वाढ झाली आहे, दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी सकाळी एक वेडसर व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. मध्यरात्री किंवा पहाटे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मयताची ओळख पटली नसून तो वेडसर असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार उघडकीस येताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. महिनाभरांपूर्वी बाभळगाव नाका परिसरात अशाच पध्दतीने एका भिकाऱ्याचा झोपण्याच्या जागेवरून खून करण्यात आला होता.