केज (बीड): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली, याचे फोटो सोमवार, 3 मार्चला विविध वृत्तवाहिन्यांवर झळकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या माध्यमांतून समोर आलेल्या फोटोतून आरोपींच्या क्रौर्याची परिसीमा समोर आली आहे. दरम्यान, फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. सीआयडीने जे चार्जशीट दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. माध्यमांसमोर आलेले हे फोटो मन विचलित करणारे आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो.
कोणी दांडक्याने मारत आहे, तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी हसत आहे. कोणी व्हिडीओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, तपास यंत्रणेने त्याचे दोषारोप पत्रही न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान, पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध पुरावे सापडल्याचे तपास यंत्रणांनी दोषारोप पत्रात म्हटले आहे. केज पोलीस ठाण्यात या प्रकरणात खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.