केज (बीड): संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला घेऊन येतो, असे म्हणून आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांना एका ठकाने फसवले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला मी घेऊन येतो, परंतु माझ्याकडे त्याला घेऊन यायला पैसे नसल्याने गाडी भाड्याने करतो. त्यासाठी कॅब टॅक्सी बुक करण्यासाठी पैसे पाठवा. असे म्हणून बारगजे नावाच्या एका ठकाने आमदार सुरेश धस यांना फोन केला. आरोपी हाती येण्याच्या अपेक्षेने सुरेश धस यांनी त्याला ५००० रुपये ऑनलाईन पद्धतीने पाठवून दिले. त्यानंतर ते नगरला साडेचार तास वाट पाहत ताटकळत थांबले.
त्यानंतर त्याने कृष्णा आंधळे याला एस पॅलेस येथे घेऊन येतो असे सांगितले. ही माहिती सुरेश धस यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीसदेखील सापळा लावून बसले. परंतु, बारगजे नावाच्या, व्यक्तीने त्यांची फसवणूक केली असल्याचे जाणवले. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनाही एकाने फोन केला, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्या ठकाने बजरंग सोनवणे यांच्याच मुलाला फोनवरून कृष्णा आंधळे हा संभाजीनगरला येत असल्याची माहिती दिली. सोनवणे यांनी ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांना दिली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी माहिती घेतली असता सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांना खोटी माहिती देऊन फसवणारा हा एकच व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस त्या बारगजे नावाच्या ठकाचा शोध घेत असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.