जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तसेच विविध आठ मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (शनिवार) (ता.25) पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. आंतरवाली सराटी येथील स्थगित केलेले उपोषण ते आजपासून सुरू करणार आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील हे जवळपास मागील 18 महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यानी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलं असून एकदा ते थेट मुंबईच्या वेशीवर जाऊन पोहचले होते. आहेत.
मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाहीत तर पुन्हा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आता आजपासून ते पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी अंतरवाली सराटीत बसणार आहेत.
जरंगे यांच्या प्रमुख 8 मागण्या
- महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी मराठा एकच आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं.
- हैदराबाद, सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करत त्यांची अंमलबजावणी कराय.
- मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस मागे घेत, सर्व गुन्हे रद्द करावेत.
- आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी.
- माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावं आणि या समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्यावी.
- सरकारने 10 टक्के SEBC आरक्षण लागू केले मात्र, ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते रद्द केलेले आरक्षण पुन्हा सुरू करावे.
- कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा, तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते पुन्हा सुरू करावेत.
- मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे.