संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 36 वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना महिलेने आरडाओरडा केला. त्यानंतर नराधमाने महिलेवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. अभिषेक तात्याराव नवपुते (19, रा. घारदोन) असे नारधमाचे नाव आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, नवपुते हा नराधम मागील अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा पाठलाग करत होता. मात्र विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. 2 मार्च रोजी विवाहिता सायंकाळी शेतात काम करत असताना नराधम विकृत तिथे गेला व तिचा गळा दाबुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी विवाहितेने तीव्र विरोध केला असता नराधमाने तिला जमिनीवर आपटले. त्यानंतर धारदार चाकूने तिचा चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात सपासप 15 ते 16 वार केले. वर करून नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विवाहिता बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचे समजून नराधमाने तिथून पळ काढला.
पीडितेच्या शरीरावर तब्बल 52 टाके..
दरम्यान, शेतातून सासू घरी येत असताना तिला रस्त्यामध्ये सून रक्तबंबाळ, बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. त्यानंतर पीडितेला तत्काळ शहरातील रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या शरीरावर तब्बल 52 टाके पडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर पीडितेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार आरोपी नवपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा करून आरोपी गाव परिसरातील शेतात लपून बसला होता. त्यानंतर अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी कारवाईच्या दिलेल्या सूचनांनुसार निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर शेतातून त्याला अटक करण्यात आली.