बीड: बीड मधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वनविभागाने छापा टाकला. यामध्ये वनविभागाला वन्यजीवांच्या शिकारीचे साहित्य सापडल्याचे समोर आले आहे.
सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावून शिकार करायचे..
अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यातील बावी हे गाव डोंगराळ भागात आहे. तेथे हरणांचे प्रमाण जास्त आहे. मात्र त्यांची शिकार करण्याचे काम सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या गँगने केल्याचा आरोप केला जात होता. बावी गावातील ढाकणे यांच्या शेतीलगत डोंगर आहे, या डोंगरांमध्ये हरीण पाणी पिण्यासाठी आणि चारा खाण्यासाठी येतात. मात्र या हरणांची सतीश भोसले आणि त्याची गँग जाळी लावून शिकार करायची. शिकार करण्यास विरोध केळल्यानंतर त्यांना मारहाण केली जायची.
वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी धाड टाकली
या प्रकरणाची वनविभागाने दखल घेतली. त्यानंतर वन विभागाने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी धाड टाकली असता वन्यजीवांच्या शिकारीचे साहित्य आढळून आले आहे. यात धारदार शस्त्र, जाळी, वाघूरीसह अनेक गोष्टी वनविभागाला आढळून आल्या आहेत. जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली होती. दरम्यान, वनविभागाला उशिरा जाग आल्याने वन्यजीवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.