बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांची मंत्री धनंजय मुंडेंशी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. या सगळ्या प्रकरणावर अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मीक कराडांशी आर्थिक संबंध असल्याचे आरोप सपशेल खोटे आहेत. हा केवळ माझ्या बदनामीचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले आहेत.
जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणात खंडणी आणि त्यातून सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणात वाल्मीक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झळा. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतील असे म्हटले जात होते. मागील दोन दिवसांपासून धनंजय मुंडे परळीत बस्तान मांडून आहेत. यानंतर काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली त्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना वाल्मीक कराड यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण असल्याचे आरोप धुडकावत हा केवळ बदनामीचा प्रयत्न असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
झालेल्या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले
प्रतिक्रिया देताना मुंडे म्हणाले ‘जे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत, त्यातील एक तरी आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर आता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचं आहे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्था निर्माण होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या माणसाला आवश्यक वाटतं. सर्वांना माझी एवढीच विनंती मला बदनाम करायचं करा,आणखी कोणाला बदनाम करायचं असेल करा. मात्र माझ्या बीड जिल्ह्याला, जिल्ह्याच्या मातीला, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैजनाथनगरीला बदनाम करू नका एवढीच माझी विनंती आहे. वाल्मीक कराड आणि माझे आर्थिक देवाणघेवाणी बाबत झालेले आरोप खोटे आहेत”. असं प्रतिक्रिया देत धनंजय मुंडे यांनी आरोप धुडकवले आहेत.