धाराशिव: तालुक्यातील ढोकी येथे आढळलेल्या बर्ड फ्लू (एच५एन१) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ढोकी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी ढोकी गावात कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाने ढोकी गावातील कोंबड्या नष्ट केल्या. दोन बाय दोनचे खड्डे खोदून कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली. ढोकी गावात केंद्रीय पथक दाखल होणार आहे.
ढोकी हे धाराशिव तालुक्यातील २० ते २५ हजार लोकसंख्या असलेले मोठे गाव आहे. येथे तेरणा सहकारी साखर कारखाना, राष्ट्रीयीकृत बँक, पोलिस स्टेशन, आठवडी बाजार, बाजारपेठ असल्याने ढोकी परिसरातील अनेक गावांतील नागरिकांचा ढोकी गावाशी दैनंदिन संपर्क आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व कोंबड्या व कोंबड्यांची अंडी नष्ट करण्यात आली. खड्डे खोडून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
परिसर क्वारंटाईन
ढोकी पोलिस स्टेशन ते सुभाष देशमुख यांच्या घरापर्यंतचा संपूर्ण परिसर क्वारंटाईन करण्यात आला. बर्ड फ्लू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिने ढोकी गावात कोंबड्या पाळण्यास व कोंबड्याचे मांस विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे.