बीड: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणी प्रकरणात जेलबंद असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडिओ बघितले म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीड मध्ये घडली आहे. अशोक मोहिते असे बेदम मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार जिल्ह्यातील केज तालुक्यातील करनळी गावात घडला आहे.
अधिक माहिती अशी की, खंडणी प्रकरणात जेलबंद असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडिओ बघितले म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीड मध्ये घडली आहे. या प्रकरणातील अशोक मोहितेला मारहाण करणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं समोर आलं आहे. कृष्णा आंधळेच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅपला कृष्णा आंधळेचा फोटो स्टेटसला ठेवला होता. या प्रकरणी वैजनाथ बांगर, अभिषेक सानप यांच्यावर अशोक मोहितेला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
अशोकला मारहाण करत कोयत्याने केले वार..
दरम्यान, खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचे व्हिडिओ अशोक मोहिते हा तरुण पाहत असताना वैजनाथ बांगर व अभिषेक सानप यांच्या नजरेस पडला. त्यांनी वाल्मिक कराडचे व्हिडीओ का पाहातो? अशी विचारणा केली. त्यानंतर अशोकला मारहाण करून कोयत्याने वार केले” असा आरोप अशोकच्या आईने केला आहे.
या प्रकरणाबाबत गावचे सरपंच शिवाजी मोहिते म्हणाले की, “आधी अशोकला दवाखान्यात नेलं. तिथून पोलीस स्टेशनला आणलं असता पोलीस तक्रार घेत नव्हते. अखेर गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणी आम्हाला जलद न्याय मिळाला पाहिजे”