बीड: बीडमधून एक लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आह . तेथे जागतिक महिला दिनीच पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव गडकर असं आरोपी अंमलदाराचं नाव आहे. तर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पाटोदा पोलीस ठाण्याचे अंमलदार गडकर याने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले होते. तेंव्हा पाटोदा स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही महिला बसने पुण्यावरून बीडला येत होती. परिसीमा म्हणजे आरोपीने तिला बसमधून खाली उतरवले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे .
अधिक माहिती अशी की, पीडित महिला काही कारणास्तव पाटोदा पोलीस ठाण्यात येत असताना नराधम अंमलदार उद्धव गडकर याच्याशी पीडित महिलरची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले. व पाटोद्यातील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केला. त्यावेळी महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेवर अत्याचार केला.
त्यानंतर पाटोदा पोलीस ठाण्यात येऊन महिलेने तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. याप्रकरणी अंमलदार गडकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.