रत्नागिरी: तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस तापमानात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता दर्शवली आहे. मुंबईसह कोकणातील काही भागात रविवार (दि. ९) आणि सोमवार (दि. १०) मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
पुणे हवामान विभागाचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुढील ४ ते ५ दिवस कोकणात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे ९ मार्च दक्षिण कोकणात व १० मार्च मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशारा आहे. त्यामुळे दररोजच्या अपडेट्स पाहा व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा, असा सल्ला देखील होसाळीकर यांनी दिला आहे. पुढील २४ तासांत कोकणातील कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतर हळूहळू २-४ अंश सेल्सिअसने वाढ होईल. पुढील ४-५ दिवसांत. कोकणातील काही भागात कमाल तापमान ३६-३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे