पालघर : भोपोली येथून आपले घरकुल मंजूर झाल्याने त्याचे मंजुरी प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नारायण रामचंद्र राहणे (३७) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झुडपात आढळला. ही व्यक्ती काही दिवसांपासून मिसिंग असल्याची नोंद पालघर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायतराज विभागातर्फे २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या मंजुरी पत्राचे व प्रथम हप्त्याचे वितरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२४-२५ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ – एकूण ५९ हजार ५३५ मंजुरी पत्र व २४ हजार ८९० प्रथम हप्त्याचे वितरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने आयोजित केला होता.
भोपोली येथील दिव्यांग शेतकरी रामचंद्र रहाणे हे जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजना मंजुरी पत्राचे स्वीकार करण्यासाठी येणे शक्य नसल्याने त्यांनी आपला मुलगा नारायण रहाणे याला पाठवले होते. शनिवारी योजनेचे विवरणपत्र स्वीकारण्यासाठी नारायण रहाणे जिल्हा परिषद कार्यालयात गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परत आला नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. त्याचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी आपल्या टीम सर्वत्र पाठवल्या होत्या. तसेच सोशल मीडियाद्वारे आवाहन करण्यात आले होते. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या लगत असलेल्या झुडपात नारायण रहाणे याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.