पुणे : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्याने चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. हैदराबाद न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली असून 28 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.आता नवनीत राणा कोर्टात हजर राहणार का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार ओवैसी यांना आव्हान दिलं होतं.तुम्हाला 15 मिनिटे लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, कोण कुठून आले आणि कोण कुठून गेले हे दोन्ही भावांना कळणार देखील नाही असे आव्हान नवनीत राणा यांनी ओवैसी बंधूंना नाव न घेता केले होते. याच वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवला आहे. त्यामुळे आता त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.नवनीत राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात हैदराबाद न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे.
अमरावती 2019 मध्ये नवनीत राणा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदाराची निवडणूक लढवून त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर अचानक त्यांनी भाजपसाठी काम करणं सुरू केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. त्यामध्ये बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य आता त्यांना चांगलचं भोवलं आहे.